अहिल्या ते राज्यशासक लोकमाता

अहिल्या ते राज्यशासक लोकमाता

६.तेजस्विनी अहिल्याबाई होळकर – अहिल्या ते राज्यशासक लोकमाता

तेजस्विनी अहिल्याबाई होळकर 

अहिल्या ते राज्यशासक लोकमाता

इतिहासाने पानोपानी…
जिची गाईली गाथा!
होळकरांची तेजस्वी ती…
पुण्यश्लोक माता!

अहिल्या ते राज्यशासक लोकमाता

अहिल्या ते लोकमाता

एका सामान्य कुळात जन्माला आलेल्या अहिल्यादेवींना लोकमातेची पदवी दिली ती प्रजेने! अहिल्या, अहिल्याबाई, अहिल्यादेवी, मातोश्री अहिल्यादेवी, लोकमाता हा त्यांचा जीवनाचा प्रवास आश्चर्यकारक होता. स्त्री असल्यामुळे त्यांच्यावर  स्त्रीत्वाची बंधने होती. बंधने असूनही त्यांनी आपले जीवन कर्तव्यपूर्तींनी
सफल करून टाकले.
 
अधिकार संपन्न आणि श्रीमंत असूनही, निर्मोही, त्यागशील, व्रतस्थ राहणे हे दिव्य अहिल्यादेवींनी जन्मभर केले. सती न जाताही त्या सती ठरल्या, ते त्यांच्या निराभिमानी वागण्यामुळेच!
 
त्यांच्यासमोर अनेक प्रलोभने होती. मोह होते. तिजोरी पैशांनी भरलेली होती. अनेक ऐषआरामी राज्ये त्यांच्यासमोर होती. आजुबाजुच्या राज्यात वाढते कर लादून प्रजेला पिळणारे राजे त्या पाहात होत्या. पण तरीही त्या कधीही प्रलोभनांना बळी पडल्या नाहीत. उलट त्याचे वागणे इतके चोख ठेवले की त्यांचा आदर्श इतरांनी पुढे ठेवावा. आपल्या तत्त्वांवर त्यांची अढळ अशी निष्ठा होती. आपल्या तेजस्वी
कर्मठ, आणि व्रतस्थ जीवनामुळे त्यांनी अक्षय कौर्ति प्राप्त केली.
 
त्यांच्या अंगी जितके सद्गुण होते तितके सर्वच्या सर्व एकाच व्यक्तिच्या ठाई असणे हा ईश्वराने केलेला एक चमत्कार होता. नाहीतर जिथे धर्मपरायणता आणि परमार्थभावना असते तिथे राजकारणी मुत्सद्देगिरोचा अंशही नसतो. आणि जिथे राजकारणी मुत्सद्दीपण असते तिथे धार्मिक सहिष्णुता आढळत नाही.
 
त्याचप्रमाणे धैर्य, शौर्य, पराक्रम असतो तिथे नम्रता किंवा परदु:खकातरता नसते. शक्ति आणि वैभवाला चरित्रसंपन्नतेची साथ लाभत नाही हे जगात आपल्याला सर्वत्र दिसते. परंतु अहिल्याबाईंच्या जीवनात सगळ्या चांगल्या शकुनकारक, आनंददायक गोष्टी एकत्र आल्या होत्या. सर्व सद्गुण जणु बहरास आले होते.
जेवढ्या धार्मिक तेवढ्याच मुत्सद्दी अशा अहिल्याबाईंचे जीवन भारतीय स्त्रीघर्माचे एक ज्वलंत उदाहरण होते.
 
धवलशुभ्र असे प्रशासन आणि काळाकुट्ट संसार अशा दोन ताण्याबाण्यावर त्यांचे जीवनवस्त्र विणलेले आहे. त्यांचा संसार संघर्षमय होता. दुःखाने भरलेला होता. प्रत्यक्ष व्यसनी पति आणि खोडकर नशेबाज अशा पुत्राने त्यांना भरपूर मनस्ताप दिला. लांबच्या नातेवाईकांनी आणि ज्याला पुढे त्यांनी सुभेदार केले त्या
तुकोजी होळकरांनी पण अहिल्यादेवींना कष्ट दिले.
 
एकाहून एक भयंकर असे दु:खाचे आघात त्यांना सोसावे लागले. अशा दारुण मन:स्थितीतसुद्धा त्यांचे
कर्तव्याचे भान कधीच सुरले नाही. प्रत्येक संकटाला त्या सर्व शक्ति पणाला लावून बाणेदारपणे तोंड देत राहिल्या. खंबीरपणे सामना देत राहिल्या. संकटापुढे त्यांनी कधीच मान टाकली नाही कौ, त्यांचे पाय लटपटले नाहीत. अवती भवती घनदाट अंधार पसरलेला असताना सुद्धा, आपल्या अलौकिक जीवनाचा दीप त्यांनी प्रज्वलित ठेवला. दैवाला शिव्याशाप न देता, दैवावर मात केली. निर्मळ सुखाचे शाश्वत दीप लावून त्यांनी सभोवती प्रकाश दिला.
 
दुःखसंकटे समर्पणाचे धडे शिकवतात, किंबहुना दुःख म्हणजे प्रभूचे आशीर्वादच विपरित वेश घेऊन येतात असे त्या समजत असत. म्हणूनच ही प्रचंड दुःखे त्यांनी धीराने स्वीकारली आणि शौर्याने त्यांच्याशी सामना दिला. प्रत्येक आघात आणि विपत्तीचे घाव सोसताना त्या जीवनाचा जयघोषच करीत राहिल्या. ईश्वराने जे दिले त्याबद्दल त्या जगन्रियंत्याची भक्ति करीत राहिल्या. कुठेही राग नाही, संताप नाही, आक्रस्ताळेपणा नाही. अविचलपणे त्या सोसत राहिल्या आणि त्यांचे व्यक्तिमत्व उंचावत गेले.
 
संकटांना छोटे करत त्या मोठ्या होत गेल्या. ही किमया सहज घडणारी नव्हती. अनेक गुणांचा समुच्चय असणाऱ्या अहिल्यादेवींनाच ते शक्‍य झाले. एखादी खरी कधीच तुटून पडली असती, मोडून गेली असती.
 
‘लोकरुढीप्रमाणे त्या सती जायला निघाल्या तेव्हा मल्हाररावांने त्यांच्यापुढे पदर पसरून त्यांना जाऊ दिले नाही. त्यावेळी ते म्हणाले जीव द्यायचाच तर या प्रजेसाठी दे. खंडूबरोबर सती जाणाऱ्या नऊजणी आहेत पण या प्रजेसाठी फक्त तूच आहेस. त्या खरंच प्रजेची आई झाल्या. मातोश्री झाल्या. आपल्या वागणुकीने
देवतास्वरुप झाल्या आणि लोकमाताही झाल्या. अहिल्यापासून लोकमातेपर्यंतचा त्यांच्या चरित्राचा  विकास अद्वितीय आहे.

अहिल्या ते राज्यशासक 

अस्सल कागदोपत्रानिशी असे सिद्ध करता येते की अहिल्यादेवी या अव्वल दर्जाच्या मुत्सद्दी होत्या. म्हणूनच त्यांनी इतक्या हिरिरीने महादजी शिंद्यांचा पाठपुरावा केला. त्यांच्या सहकार्याशिवाय महादजींना औत्तरीय राजकारणातले श्रेष्ठत्व मुळीच लाभले नसते. त्यांच्याविषयीचा माझा आदर अमर्याद वाढला आहे.” हो वाक्ये आहेत कै. जदुनाथ सरकार यांनी रियासतकारांना लिहिलेल्या पत्रातील!
 
त्यांच्या कालखंडातील काही  पत्रे  आहेत . त्यावरून त्यांची योग्यता किती थोर होती हे लक्षात येईल. हे पहिलं पत्र मल्हाररावांनी अहिल्याबाईंना लिहिलं आहे.
 

चिरंजीव अहिल्याबाईंना मल्हाररावांचा आशीर्वाद. येथे कुशल आहे. आपला हाल लिहावा. सेंधवाच्या किल्ल्याच्या कारखानदाराला खर्चाची सर्व व्यवस्था करून दिली होती. जे रुपये पाठविण्यात आले होते. ते सर्व खर्च झाले आहेत. त्याचा हिशोबही आला आहे. तो तुमच्याकडे पाठविण्यात येत आहे. पुढील खर्चासाठी व्यवस्था करून दिली पाहिजे. तुम्ही माळवा प्रांतात गेला आहात म्हणून तुम्हाला हे पत्र लिहिले आहे. किल्ल्याच्या कारखानदाराला खर्चासाठी सर्व मदत पाठवून यथायोग्य प्रबंध करावा वारंवार त्याची तक्रार येणार नाही याकडे लक्ष द्यावे. इंदूरला पोचल्यावर कधी कधी तिथून माणूस पाठवून सेंधवाच्या किल्ल्याची देखरेख करून घ्यावी. ज्यामुळे काम लवकर संपेल. किल्ल्याच्या बुरुजाचे काम पूर्ण झाल्यावर त्याच्या आजुबाजूच्या खंदकाचे काम सुरु करावे. येथून चिरंजीव संताजी होळकरास पत्र लिहिले आहे. त्याच्याकडे खर्च लवकर पाठवावा. त्याच्याशिवाय काम थांबून राहू नये याचे ध्यान ठेवावे.अधिक काय लिहावे? आशीर्वाद (मोर्तबखुद्द) ”.

 
एकदा अहिल्याबाईंनी तीर्थयात्रेला जायचा मनसुबा बोलून दाखवताच मल्हारराव म्हणाले होते कि हि तीर्थयात्रेची वेळ नव्हे, राजकारण काय, मसलत काय, मनसुबे  काय येवढे आपणास कळू नये? आमच्या छावणीस पैसा, बारूद पुरवायचे काम सोडून तीर्थयात्रेस? इंदोर, ग्वाल्हेर येथून आम्हास कुमक पाठवण्याचे प्राप्तकर्तव्य सोडून यात्रा? हे आमच्या कामास येणार नाही. आमच्या मर्जीचा प्रकार तुम्हास विदित आहेच. फौज लवकर तयार राखा.” 
 
मल्हाररावांना अहिल्याबाईंचा खूप मोठा आधार ‘होता. त्यांच्यावाचून मल्हारराव युद्धे करू शकले नसते. अहिल्याबाईंच्या कर्तृत्वावर त्यांचा दांडगा विश्वास होता. त्यांनी राजकारणाचे अनेक पदर, अहिल्याबाईंना शिकवलें होते. इतिहासात मल्हाररावांनी काही चुका केल्याही आहेत, परंतु अहिल्याबाईंना सती
जाण्यापासून त्यांनी रोखले, हे फार मोठे श्रेय त्यांच्याकडे आहे. 
 
पुढील पत्र अहिल्याबाईंच्या मोडी लिपीतील पत्राचे देवनागरीत रुपांतर आहे. 

 

राव सीवलाल कोतवाल कसबे इंदूर यासी अहिल्याबाई होळकर सुमासित सवेनम या व अलफ दुलेराव मंडलोई प। मजकूर याचे दुकान आहे. ते तुम्ही जबरदस्तीने घेतलेत म्हणोन मशारनिलेने हुजूर येऊन विदित केले. एसी यासी तुम्ही दुसर्‍याचे दुकान जबरदस्तीने घेतले याचे कारण काय? त्यावरून हे पत्र सादर केले असे. तरी मशारनिलेचे दुकान जबरदस्तीने घेतले असेल त्याचे त्यास माघार देणे. ये विषयोची फिरून बोभाट आलिया उपेगी पडणार नाही. दक्ष समजून वर्तणूक करणे जाणीजे. छ २६ रबिलावल मोर्तब खुद्द- ”.

                                                                                         (श्री. नि. छ. जमींदार यांच्या संग्रहातून)
 
यावरून राज्यशासक म्हणूनही त्यांनी केवढे कर्तृत्व मिळवले होते ते लक्षात येईल. दुकान बळकावण्यासारख्या अगदी किरकोळ गोष्टींसाठी सुद्धा त्या स्वत: तडजोडी घडवून आणण्यात पुढाकार घेत. त्यांची न्यायबुद्धी अत्यंत कार्यक्षम होती. आणि राज्यशासक म्हणून त्यांची फार आवश्यकता असते. त्यांना उत्कृष्ठ राज्यशासक म्हणून कोौर्ति लाभली त्यात त्यांच्या विलक्षण अशा न्यायनिर्णय शक्तिचा फार मोठा भाग आहे. एका विशाल राज्याचे कुशल संचलन करून त्यांनी इतरही अनेक अनन्यसाधारण कामे करून दाखवली. त्यांचे जीवन म्हणजे एक प्रेरणादायी ग्रंथच आहे. त्या ग्रंथाच्या पानापानावर सुखशांतीचा, कर्तव्याचा, शौर्याचा, खंबीरपणाचा, न्यायप्रियतेचा, औदार्याचा धार्मिकतेचा अपूर्व असा संदेश लिहिलेला आहे. त्याचं वाचन आणि मनन करून आपल्याही मनावर अत्यंत शुभ असे परिणाम होतात.
 
 त्यांचे राज्य हे खऱ्या अर्थाने रामराज्य होते. राज्यकारभाराची आदर्श अशी व्यवस्था होती. त्यांची राज्यव्यवस्थेची, भोवतालीच्या राजकौय परिस्थितीची जाण तीक्ष्ण होती. त्यांचे एखादे पत्र सुद्धा याची साक्ष देईल. 
 
त्या एका पत्रात लिहितात, 
 
“चारही बाजूंनी आपला प्रसार करण्याची योजना फिरंग्यांनी आखली आहे. कुठे दोन तर कुठे तीन पलटणी उभ्या करून फिरंगी डोके वर काढतो आहे. अशा वेळी फौजा पाठवून त्याला त्या त्या ठिकाणीच गारद केले पाहिजे म्हणजे त्यालाही चांगली जरब बसेल आणि पुढे पाय पसरण्याची त्याला हिंमत होणार नाही. नबाब, भोसले सर्वांनी मिळून फिरंग्याला पराभूत केले पाहिजे.”
 
त्या विदेशी शक्तीच्या  प्रभावामुळे अत्यंत चितित होत्या. त्यांना राजे सरदारांची स्वस्थता अनुचित वाटत होती. एकमुद्ठीने फ्रेंच फिरंगी गारद करावा’ हेच वाक्य, हाच संदेश त्यांच्या मुखात होता.
 
एक राज्यशासक या नात्याने त्यांनी सुरु केलेले अनेक प्रकल्प आपण आजही राबवतो आहोत हे केवढे आश्चर्य? जिल्हापरिषदांच्या पद्धतीने खेड्यापर्यंत न्याय ही त्यांचीच कल्पना! मुलींना शिक्षण, स्त्रियांना सैनिकी शिक्षण, हुंडाबंदी, दारुबंदी, झाडे तोडण्यास बंदी, कुटीरोद्योग या योजना आजही त्यांच्या
बुद्धीवैभवाची साक्ष देत आहेत.
 
अहिल्याबाईंच्या ठाई देशवासियांनी अगाध श्रद्धा बाळगली. आजही ती श्रद्धा अधिकाधिक गडद होत आहे. या श्रद्धेमुळे त्यांना देवत्व लाभले. गयेच्या विष्णुमंदिरत आणि महेश्वरमध्ये त्यांची मूर्ती स्थापण्यात आली असून तिची पूजा भक्तिभावाने केली जाते. अशी ही त्यांची स्फूर्तिदायक गाथा प्रत्येकाने मनन केली पाहिजे.

अहिल्यादेवींनी बांधलेल्या वास्तू  व धार्मिक  कार्याचा आढावा 

अहिल्याबाईंनी तीस वर्षे राज्य तर सांभाळलेच पण अनेक राज्यात सुंदर वास्तू उभारून देशाचे सौंदर्य
वाढवले आणि जनतेच्या हिताची कामे करून फार मोठे जनहित साधले. इतर राजांना स्फूर्तो दिली. त्यांचा आदर्श पुढे ठेवून अनेक सत्तांधारी दानाला महत्त्व देऊ लागले. त्यांनी सत्ताधाऱ्यांपुढे एक आदर्श ठेवला.
अहिल्याबाई नेहेमी म्हणत स्नानाने देहशुद्धी, ध्यानाने मनशुद्धी आणि दानाने धनशुद्धी होते. आपल्या संस्कृतीतही त्याग आणि दानधर्म याला फार महत्त्व आहे. आपली संस्कृती भोगापेक्षा त्यागावर उभी आहे. सर्वांमध्ये देवाचा अंश आहे असे मानून प्राणीमात्रांना सुख देणे, सेवा करणे, मदत करणे हाही भक्तिचाच प्रकार मानलेला आहे. 
अहिल्याबाईंचे सारे जीवन त्याग आणि सेवा यासाठीच होते असे म्हटले तर त्यात काही चूक नाही. त्याग आणि सेवा हा त्या ईश्वरभक्तिचाच प्रकार मानीत असत. त्यांचे कार्यक्षेत्र फक्त त्यांची प्रजा वा राज्य इतकेच नव्हते तर संपूर्ण मानव समाजापर्यंत ते विस्तारले होते. आज आपण सर्वधर्मसमभाव जो म्हणतो तो अहिल्यादेबींनी दोनशे वर्षांपूर्वी कृतीत आणला होता. त्यांच्या प्रेमाला, मायेला, वात्सल्याला आणि दानधर्मालाही जातीधर्माच्या सोमा कधीच नव्हत्या. आपल्या कर्तव्याचे पालन करणे हाच त्यांचा महान कर्मयोग होता. हेच त्यांचे कल्याणाचे मर्म होते.
त्यांनी आपली खाजगी संपत्ती दानधर्मात आणि अनेक देवळे घाट बांधण्यात खर्च केली याचंही कारण त्यांना पारलौकिक सुख हवे होते असे नाही तर प्रजेला सुखी करायचे होते. त्यांनी या दानाचा कधीच गाजावाजा केला नाही की समारंभ करून कौतुक करून घेतले नाही.आतापर्यंत मिळालेली माहिती पुढे आहे-
१) त्र्यंबकेश्वर : नाशिक या शहरापासून १८ मैलांवर हे बारा ज्योतिलिंगापैकी एक आहे. इथे कुशावर्त नावाचे कुंड आहे. अतिशय सुंदर असे दगडी मंदिर आहे. इथे अहिल्याबाईंनी विहिर, धर्मशाळा बांधली.

२) नंदुबार : इथे विहिर खोदली. ती आजही अहिल्याबाई विहिर म्हणून ओळखतात.

३) नाशिक  : येथे श्रीराम मंदिर बांधले आहे. त्यांचे बांधकाम मजबूत आहे.
४) अयोध्या : येथे एक राममंदिर बांधले आहे.
५) उज्जयिनी : येथे चिंतामणी गणपती मंदिर बांधले आणि महाकालेश्वराच्या पूजेची व्यवस्था करून ठेवली.
६) ओंकार : अहिल्याबाईंच्या सासूबाई गौतमाबाई यांनी बांधकाम सुरू केले होते. ते गौरी सोमनाथ मंदिर अहिल्याबाईंनी पूर्ण केले. अंमलेश्वर मंदिर बांधले. एक बाग करून त्यात छत्री उभारली.
७) कर्नाटक : गरीब लोकांच्या सहाय्यासाठी काही रक्‍कम उभारून ठेवली.
८) काशी : सुप्रसिद्ध मनकर्णिका घाट ऑक्टोबर १७८५ मध्ये बांधला. त्या कामासाठी २५००० रुपये खर्च आला होता. त्याच वर्षी तेथे दशाधमेध घाट बांधला. काशी विश्वेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार करवला. गौतमेश्वर आणि अहिल्योद्धारकेश्वर ही विशाल मंदिरे उभारली.
९) कुरुक्षेत्र : घाट आणि मंदिर बांधले.
१०) केदारनाथ : एक धर्मशाळा बांधली. जमिनीपासून सुमारे तीनशे फूट उंचीवर पाण्याचे एक सुंदर कुंड बांधले. त्यामुळे यात्रेकरूंची खूप सोय झाली.
११) कोल्हापूर : अंबाबाईच्या पूजेसाठी व्यवस्था करून ठेवली.
१२) गंगोत्री : येथे विश्वनाथ, केदारनाथ, भैरव, अननपूर्णा अशी चार मंदिरे बांधली. यात्रेकरूंसाठी सहा चिरेबंद धर्मशाळा बांधल्या. शिवाय पर्वतावर उंच ठिकाणी विश्रामस्थाने बांधली.
१३) अमर्कटक : इथे अहिल्याबाईंनी धर्मशाळा बांधली आहे.
१४) आनंद कानन : येथील विश्वेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराचा जीर्णोद्धार केला.
१५) आलमपूर : इथे मल्हारणवांचा देहांत झाला होता. तेथे हरिहरेश्वराचे मंदिर बांधले. मल्हाररावांच्या स्मृतिप्रित्यर्थ सुंदर छत्री उभारून, छत्रीसमोर खंडेराव मार्तंडाचे मंदिर उभारले. एक
सदावर्त चालू केले.
१६) गया : विष्णूमंदिराचा जीर्णोद्धार केला.
 
१७) चिखलदरा : नर्मदेची परिक्रमा करणाऱ्यांसाठी एक अन्नछत्र ठेवले होते.
 
१८) चौंडी चापडगाव : येथे महादेवाचे मंदिर आणि एक घाट बांधला. मंदिराचे नाव अहिल्येश्वर आहे. त्याच्या खर्चासाठी वार्षिक आठशे रुपये इंदूर राज्यातून दिले जातात. हे अहिल्यादेवींचे जन्मगाव!’
 
१९) जगनाधपुरी  : मुख्य मंदिरातील पूजेसाठी मंदिरास काही गावे धर्मादाय देऊन टाकली.
 
२०) जांब गाव : रामदास स्वामींच्या मठास मदत केली.
 
२१) जामघाट : एक सुंदर महाद्वार बांधले.
 
२२) चांदवड  : येथे सुंदर महाल बांधला असून तिथे त्यांची टांकसाळ होती.
 
२३) जेजुरी :मार्तडाचे मंदिर बांधले.
 
२४) ताना : येथे तिळभांडेशवराचे मंदिर बांधले.
 
२५) देवप्रयाग : हे स्थान हिमालयात गंगोत्रीच्या वाटेवर आहे. येथे अलकनंदा नावाची नदी गंगेला मिळाली आहे. तिथे अहिल्यादेवींचे एक सदावर्त आहे.
 
२६) द्वारका : पुजाअर्चा करण्यासाठी काही गावे दान दिली आहेत.
 
२७) दारुकवन : नागेश्वरातील देवतेच्या पूजेची कायम व्यवस्था केलेली आहे.
 
२८) नाथद्वारा : एक धर्मशाळा बांधली आहे.
 
२९) निफाड : निफाड ते दिंडोशी रस्त्यावर पाण्याचे कुंड तयार करविले.
 
३०) नीलकंठ महादेव : याच नावांचे सुंदर मंदिर बांधले. एक गोमुख तयार केले आहे.
 
३१) परळी : येंथील परळी वैजनाथ देवळाचा जीर्णोद्धार केला.
 
३२) पंढरपूर : श्रीराम मंदिर बांधले. होळकरवाडा आणि घाट बांधला
 
३३) प्रयाग : मोठा विशाल घाट बांधला.
 
३४) पुष्कर : एक मंदिर आणि धर्मशाळा बांधली.
 
३५) पैठण : येंथे यात्रेकरूंसाठी अन्नछत्र सुरू केले.
 
३६) पुणतांबे : एक वाडा बांधला. एक घाट आहे.
३७) बद्रीनारायण : श्रीहरीचे मंदिर बांधले. धर्मशाळा बांधून अनेक कुंडे तयार केली. देवीच्या नावाने एक सदावर्त चालू केले.
 
३८) बिदूर : ब्रह्माघाट बनवला.
 
३९) मंडलेश्वर  : खरगोण जिल्ह्यात नर्मदाकाठी हे नगर आहे. येथे देवींनी एक घाट आणि मंदिर बांधले.
 
४०) मथुरा : येथे चिरबंद धर्मशाळा बांधल्या:
 
४९) महेधर : ही अहिल्यादेवींची राजधानी होती. इथे अप्रतिम घाट आहेत. डौलदार मंदिरे आहेत; सदावर्ते आहेत.  हातमाग आहेत. तिथे अजूनही ‘कामे चालू आहेत. अहिल्यादेवींचा वाडा; देवघर, त्यांची दरबाराची जागा सर्व पाहता येते.
 
४२) रामेश्वर : एक धर्मशाळा असून अनछत्र आहे.
 
४३) रावेर : येथे पाण्याचे कुंड आहे.
 
४४) वृंदावन : अन्नछत्र स्थापन केले. लाल दगडांची एक विहिर बांधली.
 
४५) वेरूळ : गौतमाबाईंनी बांधलेल्या पृष्णेश्वंर मंदिराचा जीर्णोद्धार केला, पाण्यासाठी एक कुंड तयार केले.
 
४६) श्री शैल : मल्लिकार्जुन शिवमंदिर बांधले.
 
४७) संगमनेर : येथे राममंदिर बांधून घेतले.
 
४८) सातारा : विहिर बांधली.
 
४९) सप्तशृंगगड :एक धर्मशाळा बांधलेली आहे.
 
५०) सुलपेश्वर : अन्नछत्र स्थापन केले. या ठिकाणी प्रवाशास एक घोंगडी आणि तांब्या दिला जात असे.
 
५१) सोमनाथ : सोममनाथंचे महादेव मंदिर इंतिहास प्रसिद्ध आहे. १०२४ मध्ये महंमदगझनीने. स्वारी करून याची मोडतोड केली होती.अहिल्यादेवींनी या मंदिरांचा जीर्णोद्धार केला आणि शिवलिंगाची प्रतिष्ठापना केली. 
 
५२) हरिद्वार : या ठिकाणी पश्चिमोत्तर दिशेला कुशावर्त, हरकी पेडीच्या दक्षिणेस गंगेकाठी घाट आहे. या घाटावर अहिल्यादेवींनी विशाल धर्मशाळा बांधली. 
 
५३) हंदिया : इथे अहिल्यादेवींनो एक धर्मशाळा बांधली. अन्नछत्र कायमचे सुरू केले. ६०-७० फुटांचे सिद्धनाथ मंदिर बांधले. विशाल घाट बांधला.
 
याशिवाय कित्येक ठिकाणी विहिरी, धर्मशाळा बांधल्या. अन्नछत्रे उभी केलो. देवालयांचे जीर्णोद्धार केले. 
अन्नछत्रे, विहिरी, धर्मशाळा बांधण्यामागे त्यांचा सामाजिक दृष्टिकोन होता. अन्न, पाणी आणि निवारा या
माणसांच्या प्रमुख गरजा पुरविण्यासाठी त्यांनी केलेली ही प्रचंड धंडपड होती.
प्रत्येक कार्यासाठी स्वतंत्र अर्थव्यवस्था असल्यामुळे पुढे राज्यकर्ते बदलले तरी कुणालाही पदर पसरत मदत मागायला यावे लागले नाही. व्यवस्था सुरळित चालत राहिली. त्यांची नि:स्वार्थ सेवा मानवतेला वाहिलेली होती. जातिधर्मांच्या सीमा ओलांडून जाणारी होती.
 
 कला आणि साहित्य याकडे सुद्धा त्यांचे लक्ष होते. त्यांनी उभ्या केलेल्या वास्तू, घाट अत्यंत कलात्मक आहेत. 
 
                                       संदर्भ : महाराष्टाचे शिल्पकार तेजस्विनी अहिल्याबाई होळकर,महाराष्ट राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ,मुंबई. 

Leave a Reply

Your email address will not be published.