कर्मयोगिनी अहिल्याबाई

कर्मयोगिनी अहिल्याबाई

 १. तेजस्विनी अहिल्याबाई होळकर – कर्मयोगिनी अहिल्याबाई 

तेजस्विनी अहिल्याबाई होळकर 

कर्मयोगिनी अहिल्याबाई

इतिहासाने पानोपानी…
जिची गाईली गाथा!
होळकरांची तेजस्वी ती…
पुण्यश्लोक माता!

१. कर्मयोगिनी अहिल्याबाई

लोकमाता, पुण्यश्लोक, देवी, गंगाजळ निर्मळ, या सगळ्या पदव्या, अहिल्याबाई होळकरांना लोकांनी अर्पण केल्या होत्या. मनापासून, हृदयापासून! कुठलाही पदवीदान समारंभ न होताही, या पदव्या आज दोनशे पेक्षा जास्त वर्षे टिकून आहेत. टिकणार आहेत. अत्यंत प्रेमाने त्यांनी सामान्य माणसाचे हित बघितले. प्रजेतील गरिबांना जास्तीत जास्त सुखाने जगता यावं, इकडे लक्ष दिले.
 
त्या धार्मिक होत्या हे तर, सर्वांना माहित आहे, परंतु एक राज्यशासक म्हणून त्यांचे कर्तृत्व फार महत्त्वाचे आहे. अपार शहाणपण आणि तडफ असणारी ती अलौकिक खरी होती. खंबीर मन आणि चातुर्य यामुळे, अनेक संकटे त्यांनी पार केली. न्यायदान तर इतके अचूक की, भांडणाऱ्या  दोन्ही बाजू त्यांना दुवा देत. रणनीतीची त्यांना जाण होती. एका नजरेत हिशोब करण्यात त्या तरबेज होत्या. प्रजावत्सलता आणि परदु:खाने व्याकूळ होणारं मन, त्यांना लाभलं होतं. 
 
त्या स्वत: रणांगणात युद्धाला. उतरत! तोफा ओतणे,’जंबुऱ्याच्या’ गोळ्या तयार करणे, याचे शास्त्र त्यांना माहीत होते. घोड्यावर स्वार होण्याचे कौशल्य तर होतेच, पण त्यांनी स्रियांचे सैनिकदलही तयार केंले होते. मातीवर, देशावर निष्ठा, बाणेदार वृत्ती, साधी राहाणी, उच्च चरित्र  हे त्यांचे विशेष! 
 
त्यांचे कौटुंबिक जीवन अत्यंत दुःखी, काळेकुट्ट असे होते, पण प्रशासन धवलशुभ्र , निष्कलंक असे!  त्या धार्मिक होत्या पण धर्मांध नव्हत्या. ठिकठिकाणचे घाट, देवळे, धर्मशाळा, विहिरी,रस्ते असे त्यांचे कार्य आहे. अन्नछत्रे आणि पाणपोया आजही चालू राहिल्या आहेत. अनेकजण आपली भूकतहान तिथे शांत करीत आहे. हे सारे कार्य जातीधर्मात अडकलेले नाही. सर्व धर्मियांसाठी त्यांनी मदत केली. म्हणूनच केवळ ‘धार्मिक’ इतकीच त्यांची ओळख नाही. 
 
त्यांच्या दुरदृष्टीमुळे त्यांनी केलेले कार्य आजही जिवंत आहे कारण मंदिरे, दर्गे, अन्नछत्रे वर्गैरै ठिकाणी त्या त्या कार्याच्या खर्चासाठी त्यांनी सालाना उत्पन्न करून ठेवले. त्यांची ही दूरदृष्टी चकित करणारी आहे. त्यांच्यात अनेक सद्गुण बहरास आलेले होते. अठरा सतींच्या किंकाळ्या आणि सर्व जीवलगांचे मृत्यू त्यांना बघावे लागले. शेवटी त्या एकट्या राहिल्या. संसाराचा हा उन्हाळा सोसून, ही बाणेदार स्त्री, कुणालाही शरण न जाता कर्तव्यकठोर असा कर्मयोग आचरत राहिली. प्रजेचं सुख बघत राहिली. दुःखाला खंबीरपणे सामोरे जातांनाही आपले कर्तव्य ठामपणे त्यांनी केले. हे सर्व प्रत्येक मराठी माणसाला सामर्थ्य, शक्ति देणारे आहे.
 
                                                                            संदर्भ : महाराष्टाचे शिल्पकार तेजस्विनी अहिल्याबाई होळकर,महाराष्ट राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ,मुंबई.   
                                                                 पुढील लेख : मल्हारराव होळकरांच्या आधीचा काळ

Leave a Reply

Your email address will not be published.