कलश हे भारतीय संस्कृतीचे अग्रगण्य प्रतीक आहे

कलश हे भारतीय संस्कृतीचे अग्रगण्य प्रतीक आहे

कलश हे भारतीय संस्कृतीचे अग्रगण्य प्रतीक आहे

कलश

 

भ्रातः काश्वनलेपगोपितवहिस्ताम्राकृते सर्वतो ।

      मा मैषीः कलशः स्थिरो भव चिरं देवालयस्योपरि ।:

    ताम्रत्वं गतमेव काञ्चनमयी कीर्ती:  स्थिरो तेधुना   ।

 नान्तस्तत्त्वविचारणप्रणयिनो लोका बर्हिबुद्धयः ॥

                                            ( शाङ्गधरपद्धती:  )

 

” चारही बाजूंनो सुवर्णाचे लेपन केल्यामुळे ज्याचा ताम्रपणा झाकला  गेला आहे, अशा हे कळसा ! तू घाबरू नकोस. मंदिरावर तू कायमचा स्थिर हो. तुझी कांचनमयी कीर्ति आता  स्थिर झालेली आहे आणि त्यामुळे जले ताम्रपण निघून गेलेलेचे आहे; असे समज. आतील  तत्वांचा विचार करण्यावर ज्यांचे प्रेम आहे असे लोक बहिर्बुद्धी म्हणजे केवळ बाहेरचे पाहणारे असत नाहीत. अर्थात्‌ लोक तुझे महत्व जाणतात. तेव्हा तू उघडा पडशील. तुझे ताम्रपण जाहीर होईल हयाची तू भीती बाळगू नकोस.”‘

कांचनापेक्षा कीर्ति महान आहे आणि सुवर्णापेक्षा सोनेरी जीवन श्रेष्ट आहे. मंदिराच्या शिखरावर स्थान प्राप्त केलेला कळस ती कीर्ति व  तसले जीवन पाप्त करून चुकलेला आहे. आता त्याने स्वतःच्या बाबतीत हीन भाव राखण्याचे काही कारण नाही. लहान माणूसही महान कार्यात निमित्त बनला तर तो जीवनातील महान शिखरे गाठू शकतो. त्यानंतर त्याने स्वतःला लहान मानायचे किंवा न्यूनगंडाने दुःखी होण्याचे कारण नाही. प्रभुकार्यात निमित्त बनलेला वाल्या कोळी हा सोने आहे की नाही ते पाहा चे कारण नाही. राम-जीवनाचा महिमा गाणारा वाल्या सोनेरी जीवनाचा महर्षी वाल्मीकि बनला, आणि राम-जीवन-मंदिराच्या उन्नत शिखरावर सुवर्ण कळसासारखा शोभू लागला. त्याचे नाव इतिहासात अमर झाले. त्याच्या कीतींने अनेक कांचन-मुगुटांना निस्तेज बनवले, त्याच्या वाणीत वेदांचे वैभव व स्वरात कोकिळेचे माधुर्य  येऊन राहिले.

आपले पूर्वन जीवनात भावनेला प्राधान्य देत होते. भावपूर्ण  जीवन म्हणजेच भारतीय जीवन, भावना बदलताच जीवनाचा व्यवहार बदलून जातो. दगडाला सिंदूर लावताच भावना बदलून जाते; तो दगड न राहता हनुमान बनतो. भावना म्हणजेच जीवन व भावनाशून्यता म्हणजे मृत्यु.

आपले पूर्वज सूर्याला  नुसता जड गोळा न समजता देव समजून त्याची उपासना करीत होते. वरुणाला फक्त पाऊस न समजता त्याला  देव समजून त्याचे पूजन करीत होते आणि कळस हे वरुण-पूजनाचे प्रतीक आहे. 

संस्कृती जेव्हा सुरू झाली असेल  त्यावेळी मानवाला  वाटले असेल की पाऊस आहे म्हणून तर जीवन आहे. जर पाऊस नसता तर जीवन सुकून गेले असते. पाऊस आपली सेवा करतो, आपल्याला जीवनदान देतो तेव्हा आपणही त्याचे पूजन केले पाहिजे. परंतु त्यात एक अडचण आली पाऊस तर फक्त चारच महिने येतो तोही रोज नाही. आपल्या पूर्वजांनी त्यातून रस्ता काढला, विहीर, तलाव, नदी सर्वांचे पाणी पावसानेच दिले आहे. एखाद्या लोट्यात-कलशात ते भरून घ्यावे आणि त्याचे पूजन करावे. हया मंगल  भावनेसह कालक्रमाने रसाधिराज भगवान वरुणाची त्याच्यात स्थापना करून संस्कृतीच्या गौरववान भव्य प्रतीकांचे सर्जन केले आणि त्या कलशाचे पूजन केले,

 

कलशाचे पूजन

कलश हे भारतीय संस्कृतीचे अग्रगण्य प्रतीक आहे. म्हणूनच तर प्रत्येक महत्वाच्या शुभ प्रसंगी पुण्याहवाचन, कलशाच्या साक्षीत व सानिध्यात होते.

प्रत्येक शुभ प्रसंगात, कार्याच्या आरंभी जशी विघ्नहर्ता गणपतीची पुजा करण्यात येते तशी कलाशाची ही पूजा होते. उलट, देवपूजेपेक्षा अग्रस्थान ह्या कलशाला मिळते. पहिले त्याचे पुजन, पहिला  नमस्कार त्याला आणि नंतर विघ्नहर्त्या गणपतीला. असे प्राधान्य प्राप्त झालेला  कलश आणि त्याचे पुजन ह्यांच्या मागे अतिशय सुंदर भाव आहे. 

स्वस्तिक चिन्ह काढताच जसा सूर्य त्याच्यावर येऊन आसनस्थ होतो त्याचप्रमाणे कलश सजवताच वरुणदेव त्याच्यांत येऊन विराजमान होतो. जो संबध कमळ-सूर्याचा, तोच संबंध कलश वरुणाचा !

वास्तविक लोट्यात भरलेले, घड्यात भरलेले साधे पाणी. पण कलशाच्या स्थापनेनंतर, त्याचे पुजन झाल्यावर ते पाणी सामान्य पाणी न राहता दिव्य, ओजमय बनते.

तत्त्वायामी ब्रह्मणा वंदमानस्तदाशास्ते यजमानो हावोर्भ ।

अहेळमानो वरुणोहबोध्यु रुहसं मा न आयुः प्रमाषीः ॥

“हे वरुणदेवा ! तुला नमस्कार करून मी तुझ्याजवळ येत आहे. यज्ञात आहुती देणारा तुझ्याकडे याचना करीत आहे कीं, तू आमच्यावर राग धरू नकोस, आमचे आयुष्य कमी करू नकोस ‘ वगैरे वैदिक दिव्य मंत्रांनी भगवान वरुणाचे आवाहन करून त्याची प्रस्थापना करण्यात येते आणि त्या जलाचा अंगावर अभिषेक करून रक्षणासाठी प्रार्थना केली जाते. 

कलशपूजेच्या वेळचे प्रार्थनेचे श्लोक देखील भावपूर्ण आहेत. त्या प्राथनेनंतर तो कलश, कलश न राहता त्याच्यात पिंड ब्रह्मांडाची व्यापकता जन्म घेते. 

कलशस्य मुखे विष्णुः कंठे रुद्र समाश्रितः ।

मूले तत्र स्थितो ब्रह्मा मध्ये मातृगणाः स्मृताः ॥

कुक्षौ तु  सागरा: सर्वे सप्तद्विपा वसुंधरा ।

ऋग्वदो$थ यजुर्वेद: सामवेदो ह्यथवर्ण : ॥

अंगै  साहितः सर्वे कलश तु समाश्रेताः

अत्र गायत्री सावित्री शांतिपुष्टीकरी तथा

आयांतु मम शांत्यर्थ्य  दुरितक्षयकारकः ॥

सर्वे समुद्राः सरितस्तीर्थांनि जलद नदाः

आयांतु मम शांत्यर्थ्य  दुरितक्षयकारकः

आपल्या ऋषींनी पाण्याच्या लहानशा लोट्यात सर्वच देव, वेद, समुद्र, नद्या, गायत्री, सावित्री वगैरेची प्रस्थापना करून पापक्षय व शांतीच्या भावनेने सर्वांना एकाच प्रतीकात आणून जीवनात समन्वय साधला. बिंदूमध्ये सिंधूचे दर्शन घडविले. 

कलशाला जरा व्यापक करा म्हणजे तो कुंभ बनेल. नव्या घरात प्रवेश करण्यापूर्वी कुंभ ठेवण्याची प्रथा देखील  प्रसिद्ध आहे. जलपूर्ण कुंभाप्रमाणे घरही भावपूर्ण आणि नवपल्लवित राहावे अशी मंगळल कामना त्याच्या पाठीमागे आहे. कळशावर किंवा  कुंभावर श्रीफळ ठेवल्याने त्याची शोभा द्विगुणीत होते. श्रेष्ठ व्यक्तीच्या आगमनाच्या वेळी माथ्यावर श्रीफलयुक्त कलश घेऊन उभ्या राहणाऱ्या कुमारिकांना आपण खूप वेळा पाहातो. भावार्द्र आतिथ्य सत्काराचा हा एक आगळा प्रकार आहे.

गुजरातमध्ये नवरात्राच्या निमित्ताने ठेवण्यात येणारा ‘ गरबा ! हे कलश किंवा कुंभाचेच स्वरूप आहे. मात्र तो सजल असायच्या ऐवजी सतेज असतो. स्थापत्यशास्त्रातही कलशाचे आगळे महत्व आहे. मंदिर आले की, कलश असणारच. कलश म्हणजे शेवटचे दिखर, पूर्णतेचे प्रतीक. भगवंताचे दर्शन घेऊन कलशाचे दर्शन घेतले नाही तर दर्शन अपुर्ण राहाते. ज्ञानेश्वरांनी गीतेला मंदिर व शेवटच्या अध्यायाला ‘ कलशाध्याय ‘ म्हटले आहे. 

कलश हे  मानव देहाचे प्रतीक आहे. शरीर पवित्र आहे, सुंदर आहे, दर्शनीय आहे, पण कोठपर्यंत जोपर्यंत जीवनरूपी जल व प्राणात्मक ज्योतआहे तोपर्यत. निष्प्राण शरीर म्हणजे मूर्तिहीन मंदिर !  अमांगलिक, अभद्र! कलशामधील पाणी जसे विशाल  जलराशीचा अंडा आहे तसेच देहरूपी कलशात राहाणारा जीवात्मा व्यापाक चैतन्याचा एक अंश आहे. भगवंताने गीतेत सांगितले की, ‘मैमवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः।’  संत तुलसीदासांनीही म्हटले आहे की, देहरूपी घटात राहणारा हा जलरुपी जीवात्मा घट फुटताच जर बाहेरील  विशाल  जल्राशी-रूप चैतन्य प्रवाहात मिसळून गेला तर त्याच्या जीवनाची इतिकर्त्यव्यता समजावी. अश्या प्रकारची मुक्तीच मानवाची परमोच्च सिद्धी अथवा त्याच्या जीवन मंदिराचा कळस मानतात. पूर्णतेच्या अनुभूतीचे प्रतीक अशा ह्या कलशाचे सार्थक दर्शन न घेऊन आपणही पूर्ण बनावे हीच अभिलाषा !

 

***

(पुढील लेखात  आपण “स्वस्तिक ” या प्रातिकाबद्दल माहिती जाणून घेऊया….)

संदर्भ : संस्कृती  पूजन पुस्तक

 

Leave a Reply

Your email address will not be published.