ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले

ज्ञानज्योती सावित्रीबाई  फुले

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले

आज जगभर स्त्रियांच्या मानवी हक्कांचा प्रश्‍न ऐरणीवर आलेला आहे. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये स्त्रियांनी भरारी घेतलेली आहे. असे कोणतेही क्षेत्र नाही की जेथे स्त्रिया गुणवत्तेत पुरुषांच्या  तुलनेत मागे आहेत. प्रश्‍न फक्त संधीचा आहे. पुरुषी वर्चस्वाच्या मानसिकतेमुळे अनेकदा स्त्रियांना डावलले जाते. १७२ वर्षांपूर्वी स्त्रीशिक्षण, ज्ञानसत्ता, सामाजिक न्याय, जातिनिर्मूलन, समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांच्या प्रस्थापनेसाठी ज्यांनी सामर्प्रितपणे कार्य केले त्यात सावित्रीबाई अग्रणी होत्या.

ज्ञानज्योती सावित्रीबाई  फुले
                     ज्ञानज्योती सावित्रीबाई  फुले

जोतीराव आणि सावित्रीबाई हे एक विलक्षण आगळेवेगळे दांपत्य होते. देशातील समग्र स्त्री – शूद्रातिशूद्र वर्गाची शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक चळवळ उभारण्याचे ऐतिहासिक काम या जोडप्याने केले. पर्यायी संस्कृतीची प्रस्थापना हे त्यांचे जीवनध्येय होते. त्यांच्या कामाचे मोल सांगताना ‘दि पूना ऑनब्झर्व्हर अँन्ड डेक्कन विकली’ या वर्तमानपत्राने दीडशे वर्षांपूर्वी लिहिले होते की, हे काम म्हणजे  ‘हिंदू संस्कृतीच्या इतिहासातील एका नव्या युगाचा आरंभ होय.” खऱ्या अर्थाने ही एका भारतीय क्रांतिपर्वाची सुरुवातच होती.

जोतीरावांनी सावित्रीबाईंना शिकविले, पहिली भारतीय शिक्षिका बनविले. सार्वजनिक जीवनात येण्यासाठी प्रोत्साहन दिले हे खरेच आहे. जोतीरावांच्या नेतृत्वाखाली सावित्रीबाईंनी अनेक महत्त्वपूर्ण चळवळी केल्या असल्या तरी दरवेळेला त्यांच्यामध्ये जोतीराव नेता – सावित्रीबाई अनुयायी असेच नाते होते असे नाही. स्वत: जोतीरावांनी केलेल्या नोंदीनुसार बर्‍याच वेळेला सावित्रीबाई नेत्या होत्या, आणि जोतीराव कार्यकर्ते म्हणून काम करीत होते.

सावित्रीबाई देशातील पहिल्या शिक्षिका बनल्या तेव्हा त्या अवघ्या अठरा वर्षांच्या होत्या. शिक्षिका म्हणून विनावेतन काम करताना त्यांना किती अपार छळ सोसावा लागला ते सर्वांना माहीतच आहे. स्त्री शिक्षणाच्या या मिशनमध्ये त्यांचा सहभाग नोंदवताना तत्कालीन वृत्तपत्रे म्हणतात, या पतिपत्नींना अनेकदा जेवायलाही फुरसत मिळत नसे. या शिक्षणहक्क चळवळीत त्यांच्यासोबत जसे उच्चवर्णीय सहकारी होते तसेच दलित-मुस्छिम सहकारीही होते. लहूजी वस्ताद साळवे, राणबा महार, गणू शिवाजी मांग, धुराजी अप्पाजी चांभार, फातिमा शेख, उस्मान शेख, मुन्शी गफार बेग , लिजिट आदींचे योगदान फार महत्त्वाचे होते.

त्यांनी ‘फिमेल नेटिव्ह स्कूल्स’ आणि ‘दि सोसायटी फॉर प्रमोटिंग दि एज्युकेशन ऑफ महार्‌स, मांग्ज अन्ड एक्स्ट्रॉज’ अशा दोन शिक्षण संस्था सुरू केल्या होत्या. त्या फक्त संस्थाचालक किंवा शिक्षिका – मुख्याध्यापिका नव्हत्या तर त्या देशातील पहिल्या महिला शिक्षणतज्ज्ञही होत्या. त्यांच्या शैक्षणिक विचारांची दखल अनेक वर्षांपर्यंत घेण्यात न आल्याने फक्त एक सामान्य शिक्षिका एवढेच त्यांचे स्थान होते असे मानले गेले.

” शाळांमध्ये मुले उपयुक्त व्यापार व हस्तकला शिकतील अशा उद्योगांशी औद्योगिक विभाग संलग्न असावा “

हा त्यांचा विचार आजही किती महत्त्वाचा आहे हे वेगळे सांगायला नको. शिक्षणामुळे स्वावलंबी, स्वतंत्रपणे आणि आनंदाने जगण्याशी क्षमता यायला हवी .जीवनातील खरे – खोटे कळू लागले पाहिजे. खोटेपणा अन्याय शोषण यांच्याविरुद्ध संघर्ष करण्याची हिंमत यायला हवी. शिक्षणापासून लाभ व सुख मिळाले पाहिजे. शैक्षणिक गळती रोखण्यासाठी त्यांनी मुलामुलींना पगार देण्याची व्यवस्था  केली होती मुलाच्या आईवडिलांना शिक्षणाचे महत्व कळावे यांसाठी त्यांनी स्वतःच्या घरात  स्त्री – पुरुषांसाठी १८५४ साली प्रौढ साक्षरता अभियान सुरू केले होते.
 
शिक्षण मोफत, सक्तीचे, सार्वत्रिक आणि तळापासून दिले जावे असा आग्रह धरणारे हे संपूर्ण आशिया खंडातले पहिले आदर्श जोडपे होय. शैक्षणिक गळतीची एकूण सोळा कारणे शोधून ती दूर, करण्यासाठी त्यांनी काटेकोर उपाययोजना केल्या. ताराबाई शिंदे यांनी ‘स्त्री – पुरुष तुलना’ हा ग्रंथ लिहून स्त्री मुक्तीचा पाया घातला. मुक्ता साळवे यांच्या १८५५ च्या निबंधाने दलित साहित्याचे दालन सुरू झाले. तानूबाई बिर्जे य़ा पहिल्या भारतीय महिला संपादक बनल्या. सावित्रीबाई रोडे ही दलित महिला शतकापूर्वी समग्र चळवळीचे नेतृत्व करू लागली.
 

सावित्रीबाईंनी स्त्री हक्कांच्या  अधिकाराच्या प्रस्थापनेसाठी चालवलेल्या मोहिमा आजही प्रेरणादायी आहेत. विधवा पुनर्विवाह, विधवांच्या बाळंतपणासाठी आणि त्यांच्या अपत्यांच्या संगोपनासाठी ‘बालहत्या प्रतिबंधक गृह’ सुरू करणे, विधवांचे केशवपन थांबवण्यासाठी नाभिक बांधवांना संघटित करून त्यांचा संप घडविणे, दुष्काळात अनाथ मुलामुलींच्या प्रतिपालनासाठी व्हिक्टोरिया बालाश्रम’ चालवणे, लग्न समारंभातील अवडंबर, हुंडा, बडेजाव रोखण्यासाठी सत्यशोधक विवाह पद्धती सुरू करणे यात सावित्रीबाईंचा पुढाकार होता.

पहिला सत्यशोधक विवाह २५ डिसेंबर १८७३ रोजी लागला तो सावित्रीबाईंच्या नेतृत्वाखाली. त्यातील    मंगलाष्टकांमध्ये, ‘स्थापाया अधिकार या बायकांचे झटतसे मी सदा, अर्पाया न भी मी सर्वस्व कदा.”अशी वराने प्रतिज्ञा करण्याची जोतीराव, सावित्रीबाईंची क्रांतिकारक विचारधारा आजही कालसुसंगत आहे.

जोतीरावांच्या हयातीत आणि निधनानंतर सावित्रीबाईंनी सत्यशोधक चळवळीचे नेतृत्व केले. त्यांच्या नेतृत्वगुण, संघटन चातुर्य आणि लेखन प्रतिभा यांची दखल समाजाने फार उशिरा घेतली. त्यांचे काव्यफुले, जोतीरावांची भाषणे, पत्रे, बावनकशी सुबोध रत्नाकार’ हे मौलिक साहित्य सावित्रीबाईंच्या श्रेष्ठ प्रतिभेची साक्ष देतात. स्त्री-पुरुष समतेचा आणि शांततामय सहजीवनाचा पारदर्शक नमुना म्हणून या दोघांकडे पाहता येईल. जोतीरावांच्या मृत्यूनंतर त्यांनी स्वत: पार्थिवाला अग्नी दिला. एका स्त्रीने अंत्यसंस्कार करण्याचा हा प्रसंग चटका लावणारा आहे.

दुष्काळ, जातीय दंगली, प्लेगची साथ अशा संकटांमध्ये सावित्रीबाई कायम कार्यरत राहिल्या. १८९७ च्या प्लेगच्या साथीमध्ये शेकडो आजारी मुलामुलींना औषधोपचार करताना त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून काम केले. त्यांचे दत्तक पुत्र डॉ. यशवंत यांना या कामात त्यांनी सोबत घेतले.

 

मुंढव्याच्या दलित समाजातील पांडुरंग बाबाजी गायकवाड याला त्यांनी स्वत:च्या पाठीवरून दवाखान्यात उचलून नेले. त्याला वाचवले. जणू “ मेरा पांडुरंग नही दुंगी” असे त्यांनी प्लेगला बजावले. पांडुरंगाला वाचवताना या संसर्गजन्य आजाराने त्या घेरल्या गेल्या आणि काम करता करता त्यांना देह ठेवावा लागला. आयुष्यातील पन्नास वर्षे रात्रंदिवस समाजासाठी झुंजणारी ही ‘ज्ञानज्योती’ १० मार्च १८९७ रोजी पंचतत्त्वात विलीन झाली.

जोतीरावांपेक्षा त्यांच्या पत्नीचे कौतुक करावे तेवढे थोडेच होईल. त्यांची योग्यता काय सांगावी ? आपल्या पतीबरोबर त्यांनी संपूर्ण सहकार्य केले व वाट्यास येतील त्या सर्व हालअपेष्टा भोगल्या. उच्चवर्णीयांतील उच्चशिक्षण घेतलेल्या स्त्रियांतही अशा प्रकारची त्यागी स्त्री आढळून येणे कठीण आहे. त्या उभयतांनी लोककार्यार्थ आपले सारे जीवन खर्च केले आहे.” असे पत्र महर्षी मामा परमानंद यांनी बडोद्याच्या महाराजा सयाजीराव गायकवाड यांना ३१ जुलै १८९० रोजी लिहिले होते.

आधुनिक शिक्षणतज्ज्ञ, प्रतिभावंत कवयित्री, समाजसंघटक, स्त्री हक्कांची प्रस्थापना करणाऱ्या, समाज क्रांतिकारक असणाऱ्या सावित्रीबाईंनी जोतीरावांच्याबरोबरीने भारतीय समाजाला आधुनिक बनविण्यात पुढाकार घेतला होता. आज स्त्री हक्कांची चळवळ गतिमान होत असताना सावित्रीबाईंच्या लेकी अनेक क्षेत्रांत पुढे असलेल्या बघून त्यांना नक्कीच आनंद झाला असता.

महिला सक्षमीकरण, धोरण निर्मिती आणि निर्णय प्रक्रियेत सहभाग यात आपण बरीच मजल गाठली असली तरी अजून खूप काम बाकी आहे. सावित्रीबाई या स्त्रियांच्या मानवी अधिकाराच्या प्रतीक बनलेल्या आहेत. स्त्री भ्रूणहत्या, कौटुंबिक हिंसाचार, सार्वजनिक जीवनातील अत्याचार असे अनेक प्रश्‍न सोडविण्यासाठी सावित्रीबाईंचे विचार आणि कार्य आपल्याला प्रेरणादायी आहेत आणि राहतील.

 
                                                संदर्भ :ज्ञानज्योती सावित्रिबाई फुले : स्त्री हक्काच्या प्रणेत्या , प्रा . हरी नरके

Leave a Reply

Your email address will not be published.