भारतीय संस्कृतीच्या विभिन्न प्रतीकांमध्ये कमळाला सर्वांत अग्रस्थान आहे

भारतीय संस्कृतीच्या विभिन्न प्रतीकांमध्ये कमळाला सर्वांत अग्रस्थान आहे.

कमळ

भारतीय संस्कृतीच्या विभिन्न प्रतीकांमध्ये कमळाला सर्वांत अग्रस्थान आहे

नालस्य प्रसरो जलेष्वपि कृतावासस्य कोशेरुचिर्दंडे
कर्कशता मुखे5तिमृदुता मित्रे महान्प्रश्रयः ।
आमूलं  गुणसंग्रहव्यसनिता देषश्च   दोषाकरे
यस्येैषा  स्थितिरम्बुजलस्थ वसतियुक्तैवतत्र श्रियः॥ ‘

ज्याची नाळ जळात असूनही खूप लांबवर कित्येक कोस ज्याचा सुवास पसरला आहे, ज्याचा देठ कडक आहे, मुख अतिशय कोमल आहे, जो मित्रांना आश्रय देणारा आहे; पहिल्यापासूनच ज्याला गुणसंग्रहाचे व्यसन आहे आणि दोषांचा ज्याला द्वेष आहे. अशा पाण्यात जन्मलेल्या कमळात लक्ष्मीचा वास आहे, ते योग्यच आहे. ‘

भारतीय संस्कृतीच्या विभिन्न प्रतीकांमध्ये कमळाला सर्वांत अग्रस्थान आहे. भारतीय संस्कृतीची श्रेष्ठ विचारधारा आणि अनुपम जीवनश्रेणीचा सुभग समन्वय कमळात पाहायला मिळतो. म्हणून भारतीय संस्कृती म्हणजेच कमळ; असे म्हटले तर ते अनुचित होणार नाही. भगवान विष्णूच्या हातात कमळ पाहून संत ज्ञानेश्वरांनी अतिशय मधूर कल्पना केली की,  प्रभूला  ह्या कमळाने खऱ्या ज्ञानी भक्ताची पूजा करण्याची अभिलाषा आहे ! भक्त भगवंताची पूजा करतो ही तर सहज व स्वाभाविक घटना आहे, परंतु भगवंताला भक्ताची पूजा करावी असे वाटणे हयात भक्ताच्या जीवनाची कृतकृत्यता साठलेली आहे. ‘ भगवंताच्या हातातील  हे कमळ आपल्याला प्राप्त व्हावे ही कल्पना अतिशय रम्य, मधुर ब आकर्षक वाटते. परंतु सुंदर वस्तु प्राप्त करण्यापूर्वी प्रथम स्वतः सुंदर बनावे लागते, तसे कमलासारखे जीवन जगणारालाच ते कमळ प्राप्त होते.

भारतीय वाङ्मय कमळाचे गुणगान करताना थकत नाही, भगवान श्रीकृष्णानेही गीतेमध्ये कमळाला जीवनाचा आदर्श मानून तसे जीवन जगण्याचा आदेश दिलेला आहे.

‘ बह्मण्याध्याय कर्माणि सङ्ग त्यक्त्वा करोति यः।
लिप्यते न स पापेन पद्मपत्रमिवास्भसा ॥ ‘
 

जो आसक्तीरहित तसाच ब्रम्हार्पण वृत्तीने कर्मे करतो तो पाण्यापासून अलिप्त राहणाऱ्या कमळाप्रमाणे पापापासून अलिप्त राहतो. अनासक्तीचा आदर्श  म्हणजे कमळ. संसारात राहूनही संसाराच्या दोषांपासून मुक्‍त राहण्याची जीवन- दृष्टी कमळ देते.

जलकमलवत्‌ संसारात राहण्याची कला कमळाकडून शिकण्यासारखी आहे. करूनही न करण्याची किमया ही गीतेची अकर्मण्यावस्थेची पराकाष्टा आहे. एक पौराणिक दंतकथा आहे की, दुर्वासाचे भोजन बनवायला जाणाऱ्या गोपींचा मार्ग पूर आलेल्या यमुनेने अडवला. गोपीनी  कृष्णाला विनंती केली. कृष्णाने सांगितले : ‘ यमुनेच्या किनाऱ्यावर उमे राहून सांगा की, ‘ जर कृष्ण ब्रह्मचारी असेल तर हे नदी आम्हाला मार्ग दे! ‘ गोपींनी तसे सांगितले. नदीने मार्ग दिला. दुर्वासाला आकंठ भोजन करवून परत फिरतांना गोपींना पुन्हा तीच अडचण आली. दुर्वासाने सांगितले : ‘ नदीला सांगा की, दुर्वास पूर्णतः  उपाशी असेल  तर आम्हाला  मार्ग दे. ‘ क्रीडा करूनही क्रीडा  न करणारा कृष्ण, जेऊनही न जेवलेले दुर्वास आपल्याला संसारामध्ये जलकमलवत् राहण्याचे शिक्षण स्वतःच्या  जीवनाद्वारे देतात.

कमळाला चिखलात निर्माण करून प्रभूने आपल्याला परिस्थिती निरपेक्ष जीवन जगण्याच्या प्रेरणेचे आगळे दर्शन घडवले आहे. स्वतःच्या आजुबाजूला  चिखल पसरलेला हे, ह्याबद्दल  रडत न बसता कमळ स्वतःचा विकास  साधते. कमळाची दृष्टी नेहमी वर असते. सूर्याकडे पाहून ते स्वतःचे जीवन फुलवते. सूर्यप्रकाश हाच कमळाचे जीवन आहे, सूर्योदयाच्या वेळी उमलायचे आणि सूर्यास्ताच्या वेळी मिट्रन जायचे. केवढी आगळी सूर्यभक्ती ! आपल्या जीवनातही अशी  अनन्य ईशभक्ती असेल  तर वाटेल तसल्या दूषित  वातावरणातही आपला यथोचित विकास साधू शकतो.
मानव परिस्थिती-परवश  किंवा योगायोगाचा गुलाम आहे हि  निराशाजनक विचारधारा भारतीय संस्कृतीला मान्य नाही, योगायोगाने परिस्थितीमुळे वाईट वातावरणात जन्म झाला असेल पण मानव स्वतःचे उच्च ध्येय व दृष्टी उन्नत ठेवील  तर तो मांगल्याकडे जाऊ शकतो अशी भारतीय संस्कृतीची धारणा आहे. चिखलात राहूनही उर्ध्व दृष्टी राखून सूर्योपासना करणारे कमळ ही गोष्ट किती सरळपणे समजावते आहे ! अंधारात वाढलेला मानव प्रकाश प्राप्त करू शकतो ह्या गोष्टीची प्रचीति कमळाशिव्राय दुसरा कोण देऊ शकणार?

कमळ शतदल किंवा सहस्त्र दल असते, भारतीय संस्कृतीला अनेक पाकळ्या आहेत. विभिन्न संप्रदाय, जाती किंवा पंथ ह्यांनी शोभणारी हि संस्कृती आहे. पद्मपरागावर आकृष्ट होऊन विश्वातील मानव-भ्रमर भारतीय संस्कृतीच्या आसपास फिरत आहेत. ह्या संस्कृतीचे अमृतपान करणारे नरवीर, विश्वाच्या कोनाकोपऱ्यातही तिचे महिमागान करताना थकले नाहीत आणि म्हणून भारतीय संस्कृतीला आत्मलाघेचा आत्मश्लाघेचा दोष स्वतःवर घ्यावा लागत नाही. 

कमळ हे सौंदर्याचे प्रतीक आहे, कवींनी प्रत्येक अंगाला कमळाची उपमा दिलेली आहे. भगवंताच्या अवयवांनाही कमळाची उपमा देऊन ऋषी  मुनींनी त्याचे पुजन केले  आहे. जसे : हस्तकमल, चरणकमल, हृदयकमल, नयनकमळ, वदनकमळ वगैरे. भारताच्या स्थापत्य वास्तुशात्रात राहून राहून कमळ नजरेला पडते साहित्यातूनही जर कमळाला बाद करण्यात आले तर सरस्वतीचा एक महत्त्वाचा दागिना हरवला गेला आहे असे वाटेल, ज्याच्या उपमांचे कौतुक केले जाते. अश्या महाकवी कालिदासाने अनेक ठिकाणी कमळाचा आधार घेतलेला आहे. पंडितराज जगनाथ स्वतःच्या अन्योक्तीमध्ये  कमळाला  वगळू शकले नाहीत. राजर्षि मर्तृहरी तर सांगतात : कमळाशिताय असलेले सरोवर माझ्य़ा हृदयाला शूळासारख्या वेदना देते. पाणी व  कमळ ह्यांची शोभा अन्यन्याश्रयी आहे.

पयसा  कमलं कमलेन पयः ।
पयसा कमलेन विभाति सर: ॥
 

पाण्यामुळे कमळ शोभते, कमळाने “पाणी; आणि पाणी व  कमळ ह्या दोषांमुळे सरोवर शोभते. !
सारांश, कमळ म्हणजे अनासक्तीचा आदर्श, मांगल्याचा महिमा, प्रकाशाचे परजन, सौंदर्याची निर्मिती आणि जीवनाचे दर्शन ! म्हणूनच कदाचित्‌ आपल्या देवांनी कमळाचा पूर्णतः स्वीकार केला असावा. ब्रह्मा कमलासन आहे, विष्णु कमलहस्त आहे, लक्ष्मी कमळजा आहे आणि सूर्य तर स्वतःच्या नभाच्या नील  सरोवरात असलेले रक्तकमळ आहे.

एका कवीने कमळाला उद्देशून यथार्थच म्हटले आहे कीं ‘ हे पुंडरीक ! लोकधात्री लक्ष्मी तुझ्यात निवास करते, जगन्मित्र  सूर्याची तुझ्यावर अपार प्रीती आहे आणि भ्रमर एखाद्या बंदीजनाप्रमाणे तुझे यशोगान गात असतात. तुझ्याशी दुसऱ्या कोणत्याही फुलाची तुलना होऊ शकत नाही.तुझ्यासारखा तूच आहेस !

***

(पुढील लेखात  आपण “कलश ” या प्रातिकाबद्दल माहिती जाणून घेऊया….)

संदर्भ : संस्कृती  पूजन पुस्तक  

Leave a Reply

Your email address will not be published.