मल्हाररावांचा परिचय

मल्हाररावांचा परिचय

३. तेजस्विनी अहिल्याबाई होळकर – मल्हाररावांचा परिचय

तेजस्विनी अहिल्याबाई होळकर 

मल्हाररावांचा परिचय

इतिहासाने पानोपानी…
जिची गाईली गाथा!
होळकरांची तेजस्वी ती…
पुण्यश्लोक माता!

३. मल्हाररावांचा परिचय

मल्हारराव  होळकरांचे जीवन म्हणजे एक शौर्यगाथाच होती. होळकरांचे पूर्वज दक्षिण भारतातील वाफगाव इथे राहत  होते. परंतु काही काळानंतर ते पुणे  शहराजवळच्या होळ या गावी स्थायिक झाले. म्हणूनच त्यांना होळकर असे नांव पडले. होळ येथील खंडोजी होळकर गावच्या पाटलाचे मदतनीस होते. त्यांना १६९३ साली पुत्ररत्नाचा लाभ झाला. हा पुत्र म्हणजेच मल्हाराव होळकर. 

मल्हाररावांनी आपल्या पराक्रमाने, इतिहासात आपले स्वत:चे स्थान निर्माण केले. लहानपणी मेंढ्यांची राखण, करणारा मल्हार मोठेपणी इतिहासप्रसिद्ध घटनांचा साक्षीदार झाला: प्रजेचा तारणहार झाला. एका थोर सेनेचा सूत्रधार झाला. असामान्य शौर्य, निष्ठा यांच्या बळावर पेशव्यांचा विश्वासू सुभेदार आणि सल्लागार झाला. त्यांचे चरित्र अत्यंत रोचक आणि स्फूर्तिदायक आहे.


रामनवमीस जन्माला आलेले मल्हारराव, लहानपणापासूनच धाडसी होते. भीती ती हा शब्दच त्यांना माहित नव्हता. आईवडिलांना त्याचा अभिमान वाटे. हे बाळ पुढे काहीतरी कर्तृत्व करून दाखवेल अशी त्यांना खात्री होती. पण दुर्देवाने मल्हार तीन वर्षांचा होताच. त्याचे पितृछत्र हरपले. खंडोजीचा मृत्यू झाला. आई जिवाईवर आकाश कोसळले. खंडोजीच्या कुटुंबियांनी मल्हारकडे पाठ फिरवली. उलट त्याच्या वाटेची जमीन हडप करण्याचा उद्योग चालवला. 

मल्हारच्या जिवालाही धोका होईल अशी जिवाईला भीति वाटली. म्हणून ती छोट्या मल्हारला घेऊन खानदेशातल्या नंदुरबारजवळ असणाऱ्या तळोदे या गावी, आपल्या भावाकडे आश्रयास गेली. जिवाईचे भाऊ भोजराज बारगळ हे गांवचे अधिकारी होते. कंठाजी कदमबांडे यांच्या पदरी ते पन्नास घोडेस्वारांच्या पथकाचे नायक होते.  त्यांनी जिवाई आणि मल्हारला आधार दिला.

मल्हार आठ वर्षांचा झाला. तो रानात मेंढ्या चरायला नेई. एकदा एका झाडाखाली मल्हार झोपला होता. जिवाई दुपारी भाकरी घेऊन आली तेव्हा तिने एक अपूर्व दृष्य पाहिले. एक जातीवंत नाग आपल्या फणीचे छत्र, मल्हारच्या डोक्यावर धरून वेटोळे घालून बसला होता. जिवाई भीतीने अर्धमेली झाली. तिने आजुबाजूच्या लोकांना बोलावले. सर्वांनी ते दृष्य पाहिले. माणसांची गजबज ऐकून नाग शांतपणे निघून गेला. जिवाईला जो तो म्हणू लागला, ‘“बाई ग, हा पोर फार भाग्यवंत निघणार आहे. हा राजा होईल.” मल्हारच्या मामांनी त्यादिवसापासून त्याला रानात पाठवले नाही. घोड्यांवर देखरेख करण्याचे काम दिले. मल्हार घोडे राखण्यात पटाईत झाला. 

काही वर्षांनी जिवाई वारली; पण मामांनी भाचा मल्हार याचे शौर्य जाणले. त्याची शूराची  निधडी छाती ओळखली आणि आपली कन्या गौतमाबाई हिचा विवाह मल्हारशी करून दिला. मल्हार मोठ्या शुभवेळेला  घोड्यावर बसला. त्याने पुण्यापासून दिल्लीपर्यंत शौर्य गाजवले. पराक्रमाने मल्हारणव खरंच माळव्याचे राजे झाले. मेंढपाळाचे प्रजापाल झाले.

                                                                           संदर्भ : महाराष्टाचे शिल्पकार तेजस्विनी अहिल्याबाई होळकर,महाराष्ट राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ,मुंबई.  
                                                                                                                                            पुढील लेख :अहिल्येचा गृहप्रवेश
 

Leave a Reply

Your email address will not be published.