मल्हारराव होळकरांच्या आधीचा काळ

मल्हारराव होळकरांच्या आधीचा काळ

 २. तेजस्विनी अहिल्याबाई होळकर – मल्हारराव होळकरांच्या आधीचा काळ

तेजस्विनी अहिल्याबाई होळकर 

मल्हारराव होळकरांच्या आधीचा काळ

इतिहासाने पानोपानी…
जिची गाईली गाथा!
होळकरांची तेजस्वी ती…
पुण्यश्लोक माता!

२. मल्हारराव होळकरांच्या आधीचा काळ

सुमारे अडीचशे वर्षांपूर्वी मोहम्मद शहाची राजवट चालू होती. त्यावेळी माळवा प्रांतावर, दयाबहादूर राज्य करीत होता. मोहम्मद शहा सुखोपभोगात दंग होता. मोंगलांचे विस्तृत साम्राज्य अत्यंत स्वार्थी आणि लोभी माणसांच्या हातात सापडले होते. दयाबहादूर त्यातलाच एक! हा प्रजेचा अतोनात छळ करीत असे. त्याच्या अत्याचारांना प्रजा अंगदी कंटाळून गेली होती. 
 
दयाबहादूरच्या राज्यात मोगल सप्राटांतर्फे राव नंदलाल यांना प्रमुख अधिकारी नेमण्यात आले. कर वसूल करण्याचे काम तेच करीत. आपल्या फौजेसह ते इंदुरास रहात. त्यामुळे ‘दयाबहादूर प्रजेवर करत असलेले अत्याचार, त्यांना समक्ष दिसत. त्यांना प्रजेचा हा छळ सहन करणे कठीण होत होते. राव नंदलाल दयाबहादूरला सतत समजावत. अत्याचार, छळ थांबव अशी विनंती करीत. पण स्वार्थी दयाबहादूर लोभाने पिसाट झाला होता. अखेर राव नंदलाल बादशहांकडे गेले. त्यांना माळव्याची दयनीय स्थिती सांगितली. पण बादशहा आपल्या अधिकाऱ्यांवर वचक ठेवू शकला नाही. अधिकाऱ्यांना धाक उरला नव्हता. अखेर राव नंदलाल निराश होऊन परत आले. 
 
बादशहाने राव नंदलालांची तक्रार ऐकून घेतली नाही हे कळताच दयाबहादूरला आनंद झाला. तो अधिकच शिरजोरी करू लागला. राव नंदलाल दयाळू होते. माळव्याच्या लोकांचा छळ त्यांना बघवेना. राव नंदलाल बादशहाला दरवर्षी २५००० रुपयांचा वसूल देत. तो त्यांनी बंद केला आणि बादशहास कळवले की, ‘माळव्याच्या लोकांवर दयाबहादूरकडून जे अन्याय चालू आहेत ते यापुढे सहन केले जाणार नाहीत. आपल्या पाठिंब्यामुळेच दयाबहादूर शिरजोर झाला आहे.’ पण बादशहा केवळ उपभोगात दंग होता. त्याला हे ऐकण्यास वेळ नव्हता. कारवाई करण्यास वेळ नव्हता.
 
त्या काळात थोरले बाजीराव पेशवे, प्रजेच्या सुखासाठी, साम्राज्याचा विस्तार करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत होते. राव नंदलाल यांनी पेशव्यांना पत्र पाठवून माळव्यातील लोकांचे हाल त्यांना कळवले. बादशहा आणि दयाबहादूर यांच्याकडून होत असलेल्या प्रजेच्या छळाची पूर्ण वार्ता कळवली आणि पुढे लिहिले की, ‘आपण जर माळव्यावर चढाई केली तर मी आपणास सर्व तऱ्हेची भदत करेन.’ थोरले बाजीराव अत्यंत शूर होते. त्यांनी लगेच मल्हारराव होळकरांना माळव्यावर चढाईसाठी पाठवले. 
 
राव नंदलाल यांनी भेरूघाटाच्या मार्गाने सैन्यास माळव्यात घुसविले. हे बघताच दयाबहादूर राव नंदलाल यांचे पाय धरू लागला. त्यांना अनेक प्रलोभने दाखवली. अधिकाराची पदे देऊ केली. पण राव नंदलाल आपल्या निश्चयापासून तसूभरही दूर गेले नाहीत. दयाबहादूर अखेर भीतीने फौजेसकट पळाला आणि अखेर १२ ऑक्टोबर १७३१ रोजी मारला गेला. मल्हारावांनी माळव्यावर मराठ्यांचा झेंडा रोवला.
 
त्याच काळात अफगाण, फ्रेंच उदयास येऊ लागले होते. त्यांनी व्यापाराच्या निमित्ताने भारतात प्रवेश केला होता. इंग्रजांचे पाऊलही पुढे पडत होते. सिंध, पंजाब, काश्मीर यांवर अधिकार करत अहमदशाह अब्दाली पुढे सरकत होता. पोर्तुगालने काही स्थाने घेतली होती. उत्तर भारताची स्थिती खालावत चालली. सर्वत्र अराजक आणि अशांतता पसरली होती. यामुळे शूर मराठ्यांच्या शौर्याला, पराक्रमाला जणु आमंत्रणच मिळाले. मराठ्यांनी याचा पुरेपूर फायदा घेतला.
 
त्या काळात महाराष्ट्रात फार एकी होती. नसानसातून जणु काही शौर्य पराक्रम सळसळत होता. पेशव्यांचा झेंडा भारतभर फडकवण्यासाठी त्याचे हात शिवशिवत होते. याच काळात पेशव्यांनी भरपूर पैसा आणून आधी आपले राज्य शक्तिमान केले. चौथाई, सरदशमुखी वसूली केली. उत्तर भारतात पेशव्यांचा वचक बसवला. अशा रीतीने आपले सामर्थ्य वाढवून पेशव्यांनी बलाढ्य फौजेसह दिल्लीवर मोर्चा नेला. २८ फेब्रुवारी १७१९ रोजी, पेशव्यांनी बादशहाच्या वाड्याला वेढा दिला. 
 
२० मार्च रोजी त्यांनी बादशहाकडून तीन सनदा मिळवल्या. त्याद्वारे पेशव्यांना विस्तिर्ण प्रदेशात चौथाई आणि सरदेशमुखी करवसूलीचे अधिकार मिळाले. यावेळी मल्हाराव होळकर पेशव्यांबरोबर होते. मल्हाररावांनी शौर्याची शर्थ केली. ते पेशव्यांचे विश्वासू मित्र झाले. त्यांना बहुमोल अनुभव मिळाला. याच वेळी बाळाजी विश्वनाथ या थोरल्या पेशव्यांचा मृत्यू होऊन १७२० मध्ये बाजीराव पेशवे गादीवर आले. त्यांच्याशी मल्हाररावांचे भावासारखे प्रेमसंबंध निर्माण झाले. हे मल्हाररव होळकर म्हणजेच, अहिल्यादेवी होळकरांचे सासरे. मल्हारराव होळकरांचा पुत्र खंडेराव याच्याबरोबर अहिल्यादेवींचा विवाह झाला. आणि अहिल्याबाईंच्या तेजस्वी गाथेची सुरवात झाली.
                                                                           संदर्भ : महाराष्टाचे शिल्पकार तेजस्विनी अहिल्याबाई होळकर,महाराष्ट राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ,मुंबई.   
                                                                                                                   पुढील लेख : मल्हाररावांचा परिचय

Leave a Reply

Your email address will not be published.