सदगुणांची खाण – अहिल्या

सदगुणांची खाण – अहिल्या

५. तेजस्विनी अहिल्याबाई होळकर – सदगुणांची खाण – अहिल्या

तेजस्विनी अहिल्याबाई होळकर 

सदगुणांची खाण - अहिल्या

इतिहासाने पानोपानी…
जिची गाईली गाथा!
होळकरांची तेजस्वी ती…
पुण्यश्लोक माता!

सदगुणांची खाण – अहिल्या

हे त्या अहिल्यादेवींचं चरित्र  आहे , ज्या  सत्याला सामोरे गेल्या  ज्यांनी चोख न्याय केला, ज्यांनी दुर्बळांची पाठ राखली, ज्यांनी सत्ताधिशांना त्यांच्या चुका दाखवल्या, ज्यांनी इतरांचा पैसा विषसमान मानला. अहिल्याबाईंनी या सार्‍यासाठी आपल्या आयुष्याचा क्षणक्षण वेचला. त्यातल्याच काही ठळक गोष्टी मी आपल्याला सांगणार आहे. या कथा इतिहासात नमूद झालेल्या आहेत. त्यांच्या चरित्राचे मनमोहक रूप दाखवणाऱ्या आहेत.
 
एकदा फडनिशीत हिशोब बघता बघता त्यांना पति खंडेरावांचे खाते दिसले. त्याचा वर्षाचा तनखा दोंन’ महिन्यातच संपला होता. आता जर पति पैशांसाठी आले तर त्यांना नकार द्यावा लागणार होता. अन्‌ तो प्रसंग आलाच. नशापाणी केलेले खंडेराव अहिल्येसमोर उभे होते. अहिल्येने पैसे देण्यास नम्रपणे नकार देताच ते म्हणाले, ”मला पैसे हवेत, सल्ला तर मुळीच नको. हवेत ते पैसे अन्‌ ते आम्ही ‘नेणारच. बघुया तुम्ही आमचे काय करता ते!” त्यावर अहिल्याबाई शांतपणे म्हणाल्या, ”मी जे काय करवे ते दौलतीच्या, राज्याच्या हिताचे करावे, अशी मामंजींची आज्ञा आहे. आपल्या नांवे रुपये नाहीत. अर्थात आपली सेवा होऊ शकणार नाही.’* हे ऐकताच खंडेरावांनी अहिल्यादेवींसमोरची हिशोबाची वही घेतली अन्‌ कोपऱ्यात भिरकावली. 
 
अहिल्याबाईंच्या डोळ्यातून ठिणग्या उडू लागल्या. त्या संतापून कारभारी गंगोबातात्यांना म्हणाल्या, “तात्या, खतावणीची बेअब्रू करणाऱ्याचा जबाब लिहून घ्या, अन्‌ त्यांना पंचवीस मोहरांचा दंड ठोका.
वसूल करून घ्या, आम्ही सुभेदारीत जातो.” मागे वळूनही न पाहाता अहिल्याबाई तिथून निघून गेल्या. गंगोबातात्या थक्क झाले. ‘असे तेज पाहिले नाही’ असे शब्द त्यांच्या मुखातून निघून गेले. प्रत्यक्ष पतीलाही दंड ठोकून वसूल करणारी कठोर शिस्तीत राज्यकारभार राबवणारी अशी होती अहिल्या.
 
एकदा अहिल्याबाई फडणिशीत गेल्या तोच सांडणीस्वार पत्र घेऊन आला. त्यात फार दु:खद वार्ता होती. श्रीमंत बाजीराव पेशवे यांचा नर्मदातिरी मृत्यू झाला होता. बाजीरावांचे प्राण जाताच त्यांचा आवडता हत्ती आणि कुत्रा टाहो फोडत मरून गेले. सगळं राज्य शोकात बुडालं. मल्हारराव आले ते हृदय फुटल्याप्रमाणे
रडत राहिले. बाजीरावांना परलोकी शांती लाभावी म्हणून ब्राह्मणांना दाने दिली गेली. वस्त्रे , मुद्रा यांचे दान, धर्मकार्ये यांच्यावर भरपूर खर्च झाला.
 
काही दिवसांनी अहिल्याबाई हिशोब तपासायला बसल्या तेव्हा धर्मकार्याचा सर्व खर्च सरकारी खर्चात टाकलेला बघून चकित झाल्या. त्यांनी गंगोबातात्यांना हाक मारली. म्हणाल्या, ”तात्या, आपण थोर. बाजीराव श्रीमंतांच्या मुक्तीसाठी केलेल्या विधींचा खर्च आपण सरकारी तिजोरीवर टाकला? अहो काय म्हणावे याला?” गंगोबातात्या चाचरत म्हणाले, ”बाईसाहेब, श्रीमंतांच्या पारलौकिक शांतीसाठी
त्यांच्या सुभेदाराने  केलेली कार्ये… म्हणजे ती सरकारीच नव्हे काय? मग ती खाजगी खर्चात कशी टाकावी?” यावर तेजस्वी, निर्लोंभी, अहिल्याबाई म्हणाल्या, “तात्या, मामंजी काय फक्त सुभेदारच होते? अहो नाती काय  फक्त रक्‍तातूनच येतात? काही नाती जिवाशिवाची, त्याची मोजमापे कशी घ्यावी? मामंजी आठ दिवस अन्नाला शिवले नव्हते, बाजीराव मामंजींचे शपथबंधू होते. तात्या, हा सर्व खर्च खाजगी खर्चाकडे टाका. यापुढे ही गोष्ट खंबीरपणे पाहा. कुठल्याही प्रकारच्या खाजगी खर्चाची पैसुद्धा सरकारी तिजोरीतून येता कामा नये, याची पक्की जरब ठेवा. खाजगीतून एखादे सरकारी काम झाले तर ते आम्हास चालेल पण खाजगी कामासाठी पैचा एक हिस्साही सरकारवर पडता कामा नये यासाठी पंचागे सावध रहावे.’ अहिल्याबाईंच्या स्वराला तिखट धार होती. त्यांचा धाक जबर होता. सोसायला जड होता.
 
एक दिवस एक विधवा स्त्री  पहारेकऱ्यांचे  कडे तोडून थेट आत आली. सांगू लागली, “बाईसाहेब, मज अभागिनीस पुत्र नाही. सगळे नातलंग आपापली पोरे घेऊन दारी ठाण मांडून बसले आहेत. हे पैशांसाठी मला विषही घालतील. मला यांची पोरे दत्तक नकोत. माझ्या दासीचा पुत्र मला दत्तक घ्यायचा आहे तर 
नातेवाईकांनी दंगा माजवला आहे. बाईसाहेब, नको मला ही संपत्ती. दान करू द्या मला आपल्या पायाशी. कु्त्र्याच्या  मौतीने मरण्यापेक्षा आपल्या पायाशी राहीन तर प्रतिष्ठा पावेन. माझी संपत्ती, वाडा सारं सरकारात जमा करून घ्या!” यावर अहिल्याबाई म्हणाल्या, ”मातोश्री, नातलगांच्या रेट्यासमोर हार न घेता, तुम्हास मान्य असेल त्यास दत्तक घ्या. माझ्या राज्यात विधवेला दत्तक घेता येईल!” यावर गंगोबा तात्या हळूच अहिल्याबाईंना म्हणाले, “बाईसाहेब, अनायसे संपत्ती सरकारी तिजोरीत येते आहे, दत्तकाची परवानगी देणं म्हणजे आपलं नुकसान करून घेणं नाही का?” 
 
यावर आपला राग आवरत आवाज हलका करीत त्या म्हणाल्या, “तात्या, आपण काय हे बोलता? माळव्यातल्या विधवांना पतिच्या संपत्तीचा सुखाने उपभोग घेता यायला हवा. या विधवेच्या नातलगांना समज द्या. वाड्यावर सैनिक तैनात करा. तात्या, लक्षात ठेवा. स्त्रीयांचा सन्मान हा माळव्याचा महालौकिक व्हायला हवा.” मग त्या विधवेकडे वळत म्हणाल्या, ”मातोश्री, तुमच्या पसंतीचा दत्तक घ्या. दंगाफसादाची भाषा करणाऱ्या नातलगांना समज दिली जाईल. समारंभात संकट येवू नये म्हणून, आमचे नजरबाज तिथे राहातील. यावर गंगोबातात्या म्हणाले, “बाईसाहेब, दत्तकाचा नजराणा किती मागायचा?” यावर संतापाने अहिल्याबाई म्हणाल्या, ”विधवेचा नेकबंद गुजारा व्हावा हे बघायचं का नजराणा मागायचा? अशा  नजराण्याला दरोडा मानते मी तात्याबा! होळकरांचं राज्य प्रजेची सेवा करण्यासाठी आहे. दत्तकाला आमच्या खाजगीतून पोशाख द्या!”
 
प्रजेच्या सुखासाठी अहिल्याबाई जागरूक होत्या. विघवांचा, खियांचा छळ करणाऱ्यांना क्षमा नव्हती. खाजगी खर्चाच्या पैचाही भार सरकारी तिजोरीवर पडू नये यासाठी त्या डोळ्यांत तेल घालून दक्ष राहात. अशा होत्या अहिल्याबाई.
 

संदर्भ : महाराष्टाचे शिल्पकार तेजस्विनी अहिल्याबाई होळकर,महाराष्ट राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ,मुंबई. 

 

                                                                                   पुढील लेख : अहिल्या ते राज्यशासक लोकमाता

Leave a Reply

Your email address will not be published.